देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ७४
स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥१॥
भरतील पोटे श्वानाचिया परी । वस्ति दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा ।
ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥३॥
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती ।
यमाची निश्चिती कुळवाडी ॥४॥
______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
______________________
जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज या अभंगात भक्तीहीन आणि केवळ भौतिक सुखात जगणाऱ्या समाजावर जळजळीत कोरडे ओढत आहेत. माणसाचे मोठेपण हे त्याच्या श्रीमंती वर किंवा गावाच्या वैभवावर अवलंबून नसून तिथल्या लोकांच्या आचार,विचारावर आणि विठ्ठलभक्तीवर असते. ज्या गावात देवाचे नाव घेतले जात नाही, ते गांव आणि तिथले लोक जिवंत असूनही मृतप्राय आहेत .
स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥
ज्या गावातील रहिवासी (ग्रामवासी) भगवंताची कोणतीही सेवा किंवा भक्ती करत नाहीत, ते गाव गाव नसून साक्षात 'स्मशानभूमी' आहे आणि तिथले लोक जिवंत नसून चालती-बोलती 'प्रेते' आहेत.
भरतील पोटे श्वानाचिया परी ।
वस्ति दिली घरीं यमदूतां ॥
महाराज म्हणतात की, असे लोक केवळ 'श्वानाचिया परी' (कुत्र्यासारखे) इकडेतिकडे भटकून, वाटेल त्या मार्गाने केवळ स्वतःचे 'पोट भरण्याचे' काम करतात. त्यांच्या घरात देवाचा वास नसून त्यांनी स्वतःहून आपल्या घरी 'यमदूतांना' (मृत्यू आणि पापाच्या विचारांना) वस्ती दिली आहे. त्यांचे संपूर्ण जीवन विनाशाच्या मार्गावर चाललेले असते.
अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा ।
ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥
ज्या ठिकाणी भगवान शिव आणि विष्णू (हरी-हर) यांच्या दिव्य लिंगाची किंवा मूर्तीची पूजा-अर्चा घडत नाही, अशा अपवित्र ठिकाणी कोणतेही 'अतित' (साधू-संत किंवा अतिथी) क्षणभरही थांबत (थारा घेत) नाहीत. संतांना तिथे येणेही आवडत नाही. त्यामुळे, अशी जागा म्हणजे केवळ 'चोरांची' आणि 'कंटकांची' (लोकांना त्रास देणाऱ्या दुर्जनांची) वस्ती बनते. भक्ती नसलेले घर हे दुष्ट विचारांचे अड्डे बनून जाते.
ज्याप्रमाणे एखाद्या जंगलात केवळ बाभळीची आणि काट्यांचीच झाडे भरलेली असतात, तिथे कधीही मधुर फळे येत नाहीत, सुगंधी वारे वाहू शकत नाहीत आणि वासरू किंवा गाय तिथे आनंदाने चरू शकत नाही; लोक तिथून दूर पळतात. अगदी त्याचप्रमाणे, ज्या समाजात भक्तीचा गोडवा नाही, तो समाज त्या काट्यांच्या वनासारखा (कंटकांची वस्ती) बनतो, जिथे केवळ दुःख आणि पापाचे काटे टोचत राहतात.
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड ।
प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥
भगवंताचे नामस्मरण नसलेला देह आणि जागा ही नेहमी अपवित्रच मानली गेली आहे,
तुका म्हणे नाहीं ठावी स्थिति मती ।
यमाची निश्चिती कुळवाडी ॥
ज्या लोकांच्या बुद्धीला (मतीला) आपण कोण आहोत,? आपली खरी आध्यात्मिक स्थिती काय आहे? आणि आपले खरे हित कशात आहे,? याची कोणतीही जाणीव नाही; ते लोक विठ्ठलाची भक्ती न केल्यामुळे 'यमाची कुळवाडी' (यमाचे शेतकरी किंवा हक्काचे गुलाम) बनले आहेत. त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई शेवटी यमराज हिरावून घेतो आणि त्यांना नरकयातना भोगाव्या लागतात.
केवळ अन्न खाऊन पोट भरणे आणि संसार करणे हे कुत्र्याचेही काम आहे. माणसाचा जन्म मिळाला आहे, तर आपल्या घरात आणि गावात भक्तीचे, नामस्मरणाचे पवित्र वातावरण निर्माण केले पाहिजे. तरच आपले गाव 'स्मशान' न राहता 'वैकुंठ' बनेल.
!! रामकृष्णहरी !!
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान,
श्रीक्षेत्र देहू .
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
भगवंताचे नामस्मरण नसलेला देह आणि जागा ही नेहमी अपवित्रच मानली गेली आहे,