Contact for Advertising
26 October 2026
← Home
Education Breaking News Super Admin 25 October 2026

संत जिजाबाई कन्या विद्यालयात विद्यार्थिनींनी साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील

रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत दिवाळीनिमित्त कार्यशाळा; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

देहू : रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी व पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांना वाव दिला.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींना शालेय स्तरावरच आकाशकंदील व पणत्या तयार करण्याचे प्रशिक्षण मिळावे, तसेच त्यांच्यात सर्जनशीलता आणि हस्तकलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी बोर्ड पेपर, फ्लोरोसंट पेपर, कापडी रिबन, डिंक आणि दोरा यांसारख्या साहित्याचा वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार केले.
विद्यालयाचे कलाशिक्षक विनोद विरणक यांनी विद्यार्थिनींना आकाशकंदील तयार करण्याचे मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना हस्तकलेचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, पर्यवेक्षिका मनीषा निकम आणि रयत गुरुकुल प्रकल्पप्रमुख शिवराज तांबे यांनी विद्यार्थिनींच्या कलाकृतींचे कौतुक केले. कार्यशाळेस विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.