Contact for Advertising
28 July 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 18 June 2026

महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन

१५ दिवसांत ६ हजार किमीचा प्रवास; ३५ जिल्ह्यांतील १ हजार गोशाळांचा सहभाग.

पुणे: महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे रक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा' आयोजन करण्यात आले आहे. येत्या जून ते ५ जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मार्गक्रमण करणार असून यात्रेचा शुभारंभ २२ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व यात्रा आयोजन समितीचे प्रमुख शेखर मुंदडा यांनी दिली.

श्री. मुंदडा म्हणाले, संवाद यात्रा सलग १५ दिवस सुरू राहणार असून या दरम्यान सुमारे ६ हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये या यात्रेचे संचालन होणार असून, यामध्ये राज्यातील १ हजाराहून अधिक गोशाळा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. या संपूर्ण प्रवासात १५ हजारापेक्षा जास्त गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली जाईल.

राज्यमाता गोमाता संवाद यात्रा'ची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्देश:-
रासायनिक शेतीला पर्याय म्हणून देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, राज्यातील गोशाळा केवळ देणग्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहू शकतील, याचे मार्गदर्शन करणे. गोबर (शेण) आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खते, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तू आदी विविध मूल्यवर्धित उत्पादनांविषयी जनजागृती करणे, पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोगाच्या विविध गोपालन व संसाधने विषयक योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, आदी कार्य या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

गोशाळा संचालकांच्या आढावा बैठका घेणे, तसेच पशुसंवर्धन विभाग व गोशाळांमध्ये उत्तम समन्वय राहील यासाठी प्रयत्न करणे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक गोरक्षकांमध्ये सलोख्याचा समन्वय साधणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याचा प्रचार करून कायदेशीर बाबींविषयी समाजाला अवगत करणे. स्थानिक देशी गोवंशाच्या पालन-पोषणा संदर्भात वैज्ञानिक व पारंपरिक पद्धतींची माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार आहे.

'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'चा समारोप ५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे होणार असून सांगता समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, देशभरातील गोसेवक व गोशाळा संचालक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या यात्रेची यशस्वी सांगता करणार आहेत. या व्यापक मोहिमेत राज्यातील सर्व गोपालक, शेतकरी, सामाजिक संस्था व गोप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. मुंदडा यांनी केले आहे.

*'राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ लोगोचे अनावरण*
'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'च्या अधिकृत लोगोचे अनावरण महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सचिव तथा पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. शामकांत पाटील उपस्थित होते.