Contact for Advertising
26 October 2026
← Home
Politics Breaking News Super Admin 18 October 2026

मोशी पेन्शनवाढीसाठी केंद्र सरकारला आंदोलनाचा इशारा

EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचा मोशी येथे भव्य महामेळावा

मोशी : EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी, (ता.१७ ) मोशी येथील जय गणेश बँक्वेट हॉलमध्ये पेन्शनर्सचा भव्य महामेळावा उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आणि तालुक्यांमधून हजारो पदाधिकारी व पेन्शनधारक नागरिक उपस्थित होते. किमान पेन्शन वाढ, महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी यावेळी जोरदार आवाज उठविण्यात आला.
मेळाव्यास EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कमांडर अशोकराव राऊत, महासचिव वीरेंद्रसिंग राजावत यांच्यासह राष्ट्रीय पदाधिकारी , पिंपरी चिंचवडचे महापौर रवींद्र लांडगे, तानाजी काळभोर व विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच निधन झालेल्या पेन्शनधारकांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली.
तुटपुंज्या पेन्शनवर उदरनिर्वाह कसा करायचा?
राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कमांडर अशोकराव राऊत आणि महासचिव वीरेंद्रसिंग राजावत यांनी मार्गदर्शन करताना पेन्शनधारकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा केवळ ५०० ते १,००० रुपये इतकी तुटपुंजी पेन्शन मिळत असल्याने पती-पत्नीने या रकमेत जीवन कसे जगायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारने पेन्शनवाढीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच EPFO कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याची वेळ आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
किमान ७,५०० रुपये पेन्शनसाठी पाठपुरावा करणार :
यावेळी महापौर रवींद्र लांडगे यांनी पेन्शनधारकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. सेवानिवृत्त नागरिकांना किमान ७,५०० रुपये पेन्शन, महागाई भत्ता तसेच पती-पत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी मांडली. या मागण्यांसाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात सुभाषराव पोखरकर, शोभाताई आरस, विलास पाटील, देवीसिंग जाधव, इजाजुर रहेमान आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समितीच्या सभापती सुजाता निलेश बोराटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पेन्शनधारकांच्या मागण्यांना न्याय मिळावा, यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या वेळी उषाताई राऊत, आशाताई शिंदे, इंद्रसिंग राजपूत, गणेशशेठ सस्ते, निलेशशेठ बोराटे, सी. एम. राऊत, पुनमताई गुजर, बाळासाहेब गावडे, दशरथ आप्पा ढोरे, मोहन शिंदे, विजय आण्णा जगताप, श्रीधरभाऊ वाल्हेकर, दिलीप कहाणे, सुरेश कटारिया, गोविंद आल्हाट, अलकाताई मोरे, सविताताई शर्मा, मंगलताई काळभोर आणि रूपालीताई ढगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या कार्याचे विशेष कौतुक:
या महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. या कामाची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कमांडर अशोकराव राऊत यांनी तानाजी काळभोर यांना मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले. त्यांच्या या कौतुकामुळे शहर संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा उत्साह वाढला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र दरवडे यांनी केले. सुधीर ढगे पाटील व किसन करदोरे , सचिव विजय गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहर, पुणे, महाराष्ट्र यांच्या वतीने या महामेळाव्यास उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि पेन्शनधारक नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.