Contact for Advertising
27 October 2026
← Home
Local Breaking News Super Admin 27 October 2026

देहूत ‘कोजागिरी काव्यसंध्या’ रंगली; कवितांनी जिंकली रसिकांची मने

देहू साहित्य रसिक मंचाचा सलग तिसऱ्या वर्षी उपक्रम; नामवंत कवींच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

देहू : देहू साहित्य रसिक मंचाच्या वतीने रविवारी( ता. 25) आयोजित ‘कोजागिरी काव्यसंध्या’ हा कार्यक्रम कवितांच्या भावस्पर्शी सादरीकरणाने उत्साहात पार पडला. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्रेम, आठवणी, नातेसंबंध, आयुष्याचे विविध पैलू आणि सामाजिक वास्तव यांचे दर्शन घडविणाऱ्या कवितांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी इंद्रायणी साहित्य पीठला श्री क्षेत्र देहू साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. स्वप्निल चौधरी यांनी लिहिलेल्या दंगल या पुस्तकाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
देहू साहित्य परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय अत्रे, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, प्राचार्य प्रदीप कदम, डॉ. किशोर यादव डॉ. एहफाज मुलानी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या काव्यसंध्येत विनायक पवार, डॉ. स्वप्निल चौधरी, रोहित शिंगे, निलेश चव्हाण आणि शुभम आवळे या कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. कवींच्या प्रभावी निवेदनाने, विनोदी शैलीने आणि भावस्पर्शी शब्दांनी कार्यक्रमात रंगत आणली. प्रत्येक कवितेनंतर रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त दाद ही कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली.
प्रेमपत्रांच्या जुन्या आठवणींपासून ते आजच्या वेगवान प्रेमविश्वापर्यंतचा प्रवास विनोदी शैलीत उलगडताना कवींनी उपस्थितांना खळखळून हसवले. त्याचवेळी जुन्या आठवणी, मनातील हळवा कोपरा, विरह, नात्यांमधील ओलावा आणि आयुष्यातील अनुभव यांवर आधारित कवितांनी रसिकांना अंतर्मुख केले. निलेश चव्हाण यांनी सादर केलेली दिवाळी कालची आणि आजची ही कविता रसिकांच्या मनाला भावली.
“माणूस कोणत्याही पिढीतील असला, तरी प्रत्येकाच्या काळजात एक हळवा कोपरा कायम जिवंत असतो,” या आशयातून मानवी भावविश्वाचे सुंदर दर्शन घडले. प्रेम, मैत्री आणि आठवणींना कवितेच्या माध्यमातून उजाळा देताना कवींनी आपल्या सादरीकरणातून रसिकांशी भावनिक नाते जोडले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारसा आणि सत्य-असत्याची निर्भीड चिकित्सा करणाऱ्या साहित्यपरंपरेचाही कार्यक्रमात उल्लेख करण्यात आला. कविता ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून माणसाला नवी दृष्टी देणारी आणि समाजातील वास्तवाकडे पाहण्याची संवेदनशीलता वाढविणारी कला आहे, असा विचारही मांडण्यात आला.
कोजागिरीच्या निमित्ताने आयोजित या काव्यसंध्येत हास्य, प्रेम, विरह, मैत्री आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. देहूच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणाला समृद्ध करणाऱ्या या उपक्रमामुळे साहित्यप्रेमींना दर्जेदार काव्याचा आनंद घेण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विकास कांद यांनी उपक्रमाची भूमिका मांडली.
सचिन साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.