Contact for Advertising
28 July 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 07 July 2026

देहू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

आषाढी वारी साठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी देहूतून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले.कोल्हापूर चे श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती सपत्नीक,सुनेत्रा पवार,खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनिल शेळके,महेश लांडगे व वारकरी नागनाथ तोगरे यांच्या हस्ते महापूजा व आरती झाली.

देहू: टाळमृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोष करीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी(ता.7)देहूतून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो भाविक सहभागी झाले. हातात भगव्या पताका घेवून आषाढी वारीसाठी जमलेल्या वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम नामघोषात देहूनगरी दुमदुमली. भक्ती रसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यासमोर फेर धरला. वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा परिसरात पालखी प्रस्थान सोहळा याची देही,याची डोळा अनुभवला.
परंपरेनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपारिक कार्यक्रम पहाटे चार वाजल्यापासून सुरु झाले. पहाटे पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात संत तुकाराम महाराज संस्थान चे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांच्याहस्ते महापुजा झाली.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी सोहळा प्रमुख उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे यांच्याहस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापुजा झाली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधि मंदिरात संस्थानचे विश्वस्त वैभव महाराज मोरे,दिलीप महाराज मोरे यांच्याहस्ते महापुजा झाली.
देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज मोरे यांचे पालखी सोहळ्याचे काल्याचे किर्तन झाले. तुझिये संगती झाली आमुची निशकिंती/ नाही देखियेले ते मिळे,भोग सुखाचे सोहळे// या अभंगावर निरुपण केले.
सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू(सराफ) यांनी चकाकी देवून इनामदारवाड्यात आणल्या. दिलीप महाराज मोरे इनामदार यांच्याहस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पुजा झाली. मानकरी म्हसलेकर दिंडी यांनी डोक्यावर पादुका घेवून,संबळ,टाळमृदंग आणि तुताऱ्या वाद्यांसह वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. देऊऴवाड्यातील भजनी मंडपात संत तुकाराम महाराज पादूका आणि माऊलींच्या पादुकांची कोल्हापूर चे श्रीमंत युवराज संभाजीराजे
छत्रपती यांनी सपत्निक,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, सुनील
शेळके सपत्निक,माजी आमदार विलास लांडे, धवलसिंग मोहिते पाटील, नागपूर चे राजे मानसिंग भोसले यांच्याहस्ते महापूजा आणि आरती झाली.लातूर धामण गाव येथील नागनाथ विठ्ठल तोगरे या ज्येष्ठ वारकरी यांना यंदा पुजेचा मान मिळाला. कोथरुड येथील ग्रामोपाध्याय सुहास टंकसाळे,गिरीधर खुंटे,यशवंत केसेकर यांनी पौराहित्य केले.
संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे,विश्वस्त दिलीप महाराज मोरे,गणेश महाराज मोरे , वैभव महाराज मोरे व इतर उपस्थित होते.
सकाळी महाद्वारातून मानाच्या दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. अकलूज येथील मोहिते पाटील व बाभुळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पुजनानंतर फडकरी,मानकरी,दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. देऊवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. देऊळवाड्यातील मंदिर प्रदिक्षणा सुरु झाली.वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामचा नामघोष आणि विठुनामाचा गजर करीत वारकरी फुगड्या घरू लागले.देहभान विसरून वारकरी आनंदाने नाचत होते.प्रदिक्षिणेसाठी मानाच्या दिंड्या सज्ज होत्या. मानाचे अश्व होते.खांद्यावर गरुडटक्के आणि हातात चोप घेतलेले चोपदार होते.देऊळवाड्यातील प्रदक्षिणेनंतर सायंकाळी पालखी सोहळा इनामदारवाड्यात मुक्कामी पोचला. शासकीय पुजेनंतर(ता.8) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहऴा आकुर्डी कडे मार्गस्थ होईल.