Contact for Advertising
11 September 2026
← Home
Education Breaking News Super Admin 08 September 2026

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवारांना थेट सहभागाची संधी.१० सप्टेंबरपर्यंत ई-मेलद्वारे सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपल्या सूचना व अभिप्राय गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ पर्यंत "PuneExamReformsTaskforce@maharashtra.gov.in" या ई-मेलवर पाठवावेत.

पुणे : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या समितीच्या माध्यमातून भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, पुणे विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषयतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी पुण्यात सल्लामसलत आयोजित करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संवाद होणार आहे.
पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारीचे महत्त्वाचे केंद्र असल्याने, भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रत्यक्ष सहभाग या सल्लामसलतीत महत्त्वाचा ठरणार आहे. हा संवाद कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. पुणे जिल्ह्यासह पुणे महसूल विभागातील संबंधित घटकांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
परीक्षा प्रक्रियेतील अडचणी, अनुभव आणि सूचनांवर चर्चा होणार आहे.
भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व उमेदवारांचे अनुभव, अडचणी, अपेक्षा आणि सुधारणा सूचना समिती जाणून घेणार आहे. प्रश्नपत्रिका व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता व विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण आणि परीक्षा अनुभव यांसह भरती परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध विषयांवर सूचना मांडता येणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय कक्ष असणार आहे.
या सल्लामसलत प्रक्रियेच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे ५ व्या मजल्यावर स्वतंत्र समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, विषयतज्ज्ञ आणि अन्य संबंधित घटकांना आपल्या सूचना व अभिप्राय थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
१० सप्टेंबरपर्यंत ई-मेलद्वारे सूचना पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुकांनी आपल्या सूचना व अभिप्राय गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ पर्यंत "Pune-ExamReformsTaskforce@maharashtra.gov.in" या ई-मेलवर पाठवावेत. प्राप्त सूचना आणि प्रत्यक्ष संवादासाठी आलेल्या विनंत्यांचा आढावा घेऊन शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी संबंधित व्यक्ती व संस्थांना चर्चेची वेळ कळविण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.