Contact for Advertising
26 October 2026
← Home
Culture Breaking News Super Admin 21 October 2026

आळंदीत माऊलींसह विविध पालख्यांचे हरिनाम गजरात सीमोल्लंघन

खंडोबाचे माळरान भाविकांनी फुलले; श्रीराम, श्री स्वामी महाराज व भैरवनाथ महाराजांच्या पालख्यांचे उत्साहात स्वागत

आळंदी : विजयादशमीनिमित्त आळंदी येथील खंडोबाच्या माळरानावर माऊलींसह श्रीराम, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या पालख्यांचे हरिनामाच्या गजरात उत्साहात सीमोल्लंघन झाले.
पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंग आणि वीणेच्या निनादात परिसर भक्तिमय झाला.
परंपरेनुसार खंडोबा मंदिरात पहाटे पूजा-विधी करण्यात आले. त्यानंतर विविध मंदिरांतून पालख्यांचे प्रस्थान झाले. खंडोबा मंदिर परिसरात सर्व पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी नामजयघोष करीत सीमोल्लंघनासाठी उपस्थित होते.
या वेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, योगी निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नगारखाना प्रमुख सचिन रानवडे, चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, स्वामींचे पुजारी मुकुंदकाका गांधी, माऊलींचे मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, संतोष मोझे, योगेश आरू, मंगेश आरू, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर आणि माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्यासह विविध देवस्थानांचे पदाधिकारी, सेवेकरी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम:
विजयादशमीनिमित्त माऊली मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक, पूजा-अभिषेक, श्रींचे संजीवन समाधी दर्शन आणि महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. माऊलींच्या बागेत शमीपूजन, तर वीणा मंडपात प्रवचनसेवा झाली. पालखी मंदिरात परतल्यानंतर धूपारती आणि नित्यपूजा करण्यात आली. श्रीराम व स्वामी महाराजांच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणाही उत्साहात झाली.
श्री आवेकर भावे रामचंद्र संस्थानच्या श्रीराम मंदिरातून श्रीरामाची पालखी हरिनाम गजरात काढण्यात आली. या वेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राहुल आवेकर, माजी ज्येष्ठ विश्वस्त बिपीन चौबे, विश्वस्त अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर, चिन्मय चौबे, रमेश मसुडगे, लक्ष्मीकांत दंडनाईक, महेश आयचित यांच्यासह सेवेकरी, वारकरी शिक्षण संस्थांचे साधक आणि विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखीचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, भैय्या वाघमारे, सौरभ गव्हाणे, सतीश कुऱ्हाडे, उमेश कुऱ्हाडे, समीर कुऱ्हाडे, योगीराज कुऱ्हाडे, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, थोरल्या पादुका देवस्थानचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर आणि नरहरी महाराज चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपट्याची पाने देत दसऱ्याच्या शुभेच्छा:
सीमोल्लंघनानंतर भाविकांनी आपट्याची पाने एकमेकांना देत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी तसेच वाहनपूजनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. भजन, अभंग आणि आरतीमध्ये भाविक तल्लीन झाले. पालखी मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पालख्यांचे दर्शन घेतले. भाईचारा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुलतान शेख, राजेंद्र धोका परिवार आणि स्थानिक ग्रामस्थांनी पालख्यांचे स्वागत केले. पद्मावतीदेवी मंदिरातही परंपरेनुसार नवरात्रोत्सवाची सांगता झाली.
पोलीस बंदोबस्तामुळे मिरवणुका सुरळीत:
आळंदीतील विविध पालख्यांचे मार्ग आणि प्रस्थानाची ठिकाणे वेगवेगळी असल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके आणि पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे यांनी नियोजनासाठी पुढाकार घेतला. पालखी मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मिरवणुक सुरळीत पार पडल्या.