(मुकुंद परंडवाल यांजकडून)
पुणे: आज आपण एक आक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिण्याची इच्छा झाली. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. जगदीश हिरेमठ.
डॉक्टर हिरेमठ यांच्याशी माझा परिचय साधारण वर्षभरापूर्वी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये झाला. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी माझ्या मनात प्रचंड भीती होती. एका रुग्णालयात अँजिओग्राफी केल्यानंतर मला तातडीने अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. "कधी काय होईल सांगता येत नाही," असेही मला सांगण्यात आले होते. त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय अक्षरशः घाबरून गेलो होतो.
त्या काळात भीतीचा माझ्यावर इतका परिणाम झाला की अवघ्या चार महिन्यांत माझे जवळपास सात किलो वजन कमी झाले. मला सतत वाटत होते की आपल्याला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
अशा परिस्थितीत माझ्या मेव्हण्याच्या सल्ल्याने मी डॉ. जगदीश हिरेमठ यांची भेट घेण्याचे ठरवले. सरांची अपॉइंटमेंट मिळणे कठीण असते, असे अनेकांकडून ऐकले होते. मात्र माझ्या नशिबाने मला दुसऱ्याच दिवशी दुपारी दोन वाजता त्यांची भेट मिळाली.
त्यानंतर आजपर्यंत माझी सरांशी पाच वेळा भेट झाली आहे.
या पाच भेटींमध्ये एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली—सर डॉक्टर आहेत आणि मी त्यांचा रुग्ण आहे, ही भावना मला कधीच जाणवली नाही. उलट, एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीसमोर आपण बसलो आहोत आणि ते आपल्याला प्रेमाने, आपुलकीने मार्गदर्शन करत आहेत, अशीच भावना प्रत्येक वेळी मनात निर्माण झाली.
या एक वर्षाच्या पाचही भेटींमध्ये सरांनी मला "तुम्हाला अँजिओप्लास्टी करावी लागेल," असे कधीही सांगितले नाही. त्यांच्या समजावून सांगण्याच्या पद्धतीमुळे आणि त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे माझ्या मनातील हृदयरोगाची भीती हळूहळू दूर झाली.
शाळेत नोकरी करत असताना आणि त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात काम करताना होणारी धावपळ मी थोडी कमी केली. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज मला जाणवली.
"आपले आरोग्य उत्तम असेल तरच आयुष्यातील बाकी सर्व गोष्टींचा आनंद घेता येतो," हा विचार मला सरांकडे पाहिल्यानंतर अधिक प्रकर्षाने जाणवला.
सरांमध्ये मला अमिताभ बच्चन दिसतात!
सरांकडे जेव्हा मी बसलेलो असतो, तेव्हा मला आवर्जून 'कोण बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची आठवण होते. माझ्यासमोर अमिताभ बच्चन बसले आहेत, अशी एक वेगळीच भावना मनात निर्माण होते.
सरांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे बोलणे, त्यांची शैली, त्यांचा शांत स्वभाव आणि रुग्णाला समजून घेण्याची पद्धत—या सगळ्यामुळे मला त्यांच्यात अमिताभ बच्चन यांच्यासारखेच एक वेगळे व्यक्तिमत्त्व जाणवते.
रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्याची सरांची पद्धत विलक्षण आहे.
"काही होणार नाही, काळजी करू नका," एवढे आश्वासनही एखाद्या घाबरलेल्या रुग्णासाठी किती मोठे औषध ठरू शकते, हे मला स्वतःच्या अनुभवातून जाणवले.
कदाचित म्हणूनच रुग्ण बरा होण्याच्या प्रक्रियेत डॉक्टरांच्या औषधोपचाराइतकेच त्यांच्या शब्दांचे आणि त्यांच्या आत्मविश्वासाचेही महत्त्व असते.
डॉ. हिरेमठ यांच्याबद्दल मला वैयक्तिक पातळीवर फारशी माहिती नाही. मात्र हृदयरोगासंदर्भातील त्यांचे एक पुस्तक माझ्या पाहण्यात आले आहे. त्यातील थोडा भाग वाचला असून, हृदयरोगाच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती त्यांनी त्यामध्ये दिल्याचे जाणवले.
आज त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात हजारो रुग्ण प्रतीक्षा करत असतात. अपॉइंटमेंट घेऊन दूरदूरवरून आलेले रुग्ण त्यांच्या भेटीची वाट पाहत असतात. सकाळी साडेनऊपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत ते रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असतात.
दिवसभर हजारो लोकांशी संपर्क येऊनही प्रत्येक रुग्णाला समजून घेणे, त्याची भीती कमी करणे आणि त्याला मानसिक आधार देणे ही साधी गोष्ट नाही.
माझ्यासाठी डॉ. जगदीश हिरेमठ हे केवळ हृदयरोगतज्ज्ञ नाहीत.
ते रुग्णांच्या हृदयावर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या मनावरही उपचार करणारे डॉक्टर आहेत.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने अशा संवेदनशील, शांत आणि रुग्णांच्या मनातील भीती समजून घेणाऱ्या डॉक्टरांना मनःपूर्वक शुभेच्छा!
सरांचे आरोग्य उत्तम राहो, त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून हजारो रुग्णांची सेवा घडत राहो, हीच मनापासून सदिच्छा.
— एक कृतज्ञ रुग्ण
देहू संतवाणी
देहू
डॉ. जगदीश हिरेमठ हृदयरोग रुग्णांसाठी हृदय असणारे डॉक्टर
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विशेष लेख, हृदयरोग रुग्णांसाठी एक दीपस्तंभ असलेले जेष्ठ डॉक्टर जगदीश हिरेमठ