जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 06 October 2026

।।श्री तुकोबाराय चैतन्य।।

जीवनातील सर्व चिंता, कर्म-कुकर्माची भीती आणि दुःख तोपर्यंतच असते, जोपर्यंत आपला अहंकार जिवंत असतो.

देहू :
माझिया मीपणा ।
झाला यावरी उगाणा ॥१॥
भोगी त्यागी पांडुरंग ।
त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥
टाळिलें निमित्त ।
फार थोडें घात हित ॥२॥
यावें कामावरी ।
तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥
_____________________
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
_____________________
जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज या अभंगात स्वतःच्या आत्मानुभूतीची सर्वोच्च अवस्था मांडत आहेत. परमार्थातील सर्वात मोठा शत्रू हा माणसाचा 'अहंकार' (मीपणा) असतो. जोपर्यंत 'मी करतो' हा भाव असतो, तोपर्यंत माणूस कर्माच्या बंधनात अडकतो. पण जेव्हा हा मीपणा पूर्णपणे गळून पडतो, तेव्हा साधकाचे संपूर्ण जीवनच भगवंताचे रूप बनते.
मीपणाचा अंत आणि भगवंताचे अधिष्ठान:
अभंगाच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराज म्हणतात,
"माझिया मीपणा । झाला यावरी उगाणा ॥"
"भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥"
'उगाणा' म्हणजे हिशोब चुकता होणे किंवा शेवट होणे. महाराज म्हणतात, माझ्या मनातील 'मी आणि माझे' या देहबुद्धीचा आता पूर्णपणे शेवट झाला आहे. आता माझ्या शरीरात (अंगात) साक्षात पांडुरंगानेच वस्ती केली आहे. त्यामुळे या देहाद्वारे जे काही भोग भोगले जातात किंवा ज्या गोष्टींचा त्याग केला जातो, ते सर्व आता माझे राहिले नसून पांडुरंगाचेच झाले आहे. खाणारा, पिणारा, भोगणारा आणि त्याग करणारा आता तो विठ्ठलच आहे.
निमित्त आणि चिंतांचा नाश:
पुढील चरणात महाराज जगण्याचा अद्भुत सिद्धांत सांगतात: "टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥"
लौकिक जगात माणूस नेहमी 'माझे काय हित होईल' किंवा 'माझा काय घात (नुकसान) होईल' या चिंतेत असतो. या सर्व हिताहिताचे मूळ कारण माणसाची देहबुद्धी हेच 'निमित्त' असते. तुकोबाराय म्हणतात की, मी ते निमित्तच म्हणजेच तो अहंकारच मुळासकट संपवून टाकला आहे. जेव्हा 'मी'च उरलो नाही, तेव्हा माझे चांगले किंवा वाईट होण्याची काळजीच उरली नाही.
ज्याप्रमाणे कळसूत्री बाहुली स्वतःहून काहीच करत नाही, तिला नाचवणारा दोरीची सूत्रे हातात धरून असलेला सूत्रधार असतो. बाहुलीला स्वतःचे सुख-दुःख किंवा मान-अपमान नसतो. त्याचप्रमाणे तुकोबारायांनी आपल्या जीवनाची दोरी विठ्ठलाच्या हाती दिली आहे.
"आता जे जे कर्म घडे । ते ते ईश्वराचे चि जोडे ॥"
जेव्हा साधक आपले मीपण अनंताच्या चरणी ठेवून देतो, तेव्हा त्याच्या हातून घडणारे प्रत्येक कर्म हे ईश्वराचेच कर्म समजून त्याला तो समर्पित करतो.
ईश्वरी कार्यात समर्पण
शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात,
"यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥"
आता माझ्या स्वतःच्या अशा कोणत्याही कामिक (वासनायुक्त) इच्छा शिल्लक राहिलेल्या नाहीत. माझ्या मनात 'मी'पणाची कोणतीही उरी (शिल्लक) राहिलेली नाही. आता मी फक्त पांडुरंगाने दिलेल्या 'कामावर' म्हणजेच त्याच्या भक्तीच्या आणि नामस्मरणाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे. माझे व्यक्तिगत अस्तित्व संपून मी समष्टीचा (देवाचा) झालो आहे.
निष्कर्ष:
'' जीवनातील सर्व चिंता, कर्म-कुकर्माची भीती आणि दुःख तोपर्यंतच असते, जोपर्यंत आपला अहंकार जिवंत असतो. ज्या दिवशी आपण 'मी आणि माझे' विठ्ठलाच्या चरणी सोपवू, त्या दिवशी आपले जीवनही परम शांतीने आणि ईश्वरी आनंदाने भरून जाईल.
!!रामकृष्णहरी !!
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्री क्षेत्र देहू.