जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 15 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य।।

आंतरिक शांतीशिवाय बाह्य सुखाची साधने व्यर्थ आहेत. जोपर्यंत मनाची तळमळ थांबत नाही, तोपर्यंत माणसाला कुठेही विश्रांती मिळत नाही

देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ६३
चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥१॥
बहु खोटा अतिशय ।जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥
_____________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
_____________________
जगातल्या प्रत्येक माणसाला 'सुख' हवे आहे आणि ते सुख मिळवण्यासाठी त्याची रात्रंदिवस धडपड सुरू आहे. पण सुख नक्की कशात आहे? पैशात, दागिन्यांत की उपभोगात? तुकोबाराय या अभंगातून ठामपणे सांगतात की, जोपर्यंत माणसाचे चित्त (मन) समाधानी नाही, तोपर्यंत जगातील कोणतीही मौल्यवान वस्तू त्याला सुख देऊ शकत नाही. सुख हे वस्तूंवर अवलंबून नसून मनाच्या स्थितीवर अवलंबून असते.
चित्त समाधान ।तरी विष वाटे सोनें ॥
जर माणसाचे मन आतून पूर्णपणे समाधानी असेल, तर त्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती किंवा साधी गोष्टही मौल्यवान वाटते. उलटपक्षी, मन समाधानी नसेल, तर सोन्यासारखी अत्यंत मौल्यवान आणि सुखावह वाटणारी वस्तूही विषासारखी दुःखद भासू लागते.
म्हणून मनावर ताबा ठेवा:
बाह्य वस्तू गोळा करण्यापेक्षा मनाला स्थिर आणि तृप्त ठेवण्याचा प्रयत्न करा.
सुख हे बाह्य जगात नसून आपल्या अंतरंगात आहे. अंतरीचे समाधान हेच खरे वैभव आहे.
बहु खोटा अतिशय ।जाणां भले सांगों काय ॥
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक किंवा हाव (अतिशय) हा नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो. तुकोबाराय म्हणतात, "तुम्ही सर्व सुजाण आणि भले (विचारी) लोक आहात, तुम्हाला मी अजून वेगळे काय सांगू?"
'अति तिथे माती' या उक्तीप्रमाणे जगात कोणत्याही गोष्टीचा, मग तो संपत्तीचा असो वा वासनेचा, अतिरेक माणसाला विनाशाकडे नेतो. मर्यादेत राहणे आणि प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हाच सुखी होण्याचा मार्ग आहे.
मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥
जर मनामध्ये तीव्र असंतोष, वासना, मत्सर किंवा चिंतेची आग लागलेली असेल (तळमळ), तर शरीराला थंडावा देणारे बाह्य उपचारही निरुपयोगी ठरतात. शरीराला शीतलता देणारे चंदन जरी अंगाला लावले, तरी ते मनाच्या अस्वस्थतेमुळे अग्नीसारखे अंग पोळू लागते.
आंतरिक शांतीशिवाय बाह्य सुखाची साधने व्यर्थ आहेत. जोपर्यंत मनाची तळमळ थांबत नाही, तोपर्यंत माणसाला कुठेही विश्रांती मिळत नाही.अति हाव धरल्याने मन कधीही शांत होत नाही. जे मिळाले आहे त्यात समाधानी राहायला शिका.
तुका म्हणे दुजा ।उपचार पीडा पूजा ॥
संत तुकाराम महाराज म्हणतात की, ज्याच्या मनात प्रपंचाची आसक्ती आणि असंतोष भरलेला आहे, त्याला सुख देण्यासाठी केलेले इतर सर्व बाह्य उपचार, आदरातिथ्य किंवा पूजा हे सर्व त्याला केवळ पीडा (त्रास) देणारे ठरतात.
जोपर्यंत मूळ रोग (मनाचा असंतोष) दूर होत नाही, तोपर्यंत केलेले इतर सर्व उपचार वरवरचे ठरतात. आत्मिक सुखापुढे इतर सर्व बाह्य उपचार फिके आहेत.
मनाची तळमळ फक्त भगवंताच्या नामस्मरणाने आणि भक्तीनेच शांत होऊ शकते.

!! रामकृष्णहरी !!
क्रमश:

नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्री क्षेत्र देहू.