दुजे खंडे तरी ।
उरला तो अवघा हरी ।
आपणाबाहेरी ।
न लगे ठाव धुंडावा ॥१॥
इतुलें जाणावया जाणा ।
कोंड तरी मनें मना ।
पारधीच्या खुणा ।
जाणतेणेचि साधाव्य ॥ध्रु.॥
देह आधीं काय खरा ।
देहसंबंधपसारा ।
बुजगावणें चोरा ।
रक्षणसें भासतें ॥२॥
तुका करी जागा ।
नको वासपूं वाउगा ।
आहेसि तूं अंगा ।
अंगीं डोळे उघडी ॥३॥
_______________________
।।श्री तुकोबराय चैतन्य।।
_______________________
या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला 'अंतर्मुख' होण्याचा आणि स्वतःमधील देवत्व ओळखण्याचा मोलाचा संदेश देत आहेत.
"भेद तुटलीया वरी ।
आम्ही तुमचींच हरी॥"
जोपर्यंत मनातील दुजेपणा आणि देहाचा खोटा अभिमान संपत नाही, तोपर्यंत देव सापडत नाही,
दुजेपणा संपला की देवच उरतो:
जसा सूर्योदय झाला की, अंधकार नाहीसा होऊन सर्वत्र प्रकाश पसरतो, तसेच मनातील 'दुजेपणा' (भेदभाव, देव वेगळा आणि मी वेगळा हा भाव) संपला की जे स्वरूप उरते, तोच एक विठ्ठल असतो. मग त्या परमेश्वराला शोधण्यासाठी बाहेर कुठेही भटकण्याची गरज उरत नाही. ज्ञान मिळाल्यामुळे द्वैतभावनेचा निरास होतो, सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे, त्यांच्यात आणि माझ्यात काही फरक नाही हे ध्यानात येते.
मनाने मनाला कोंडणे:
(पारध्याची खूण):
अंतःकरणाच्या ठिकाणी असणारे मल, विक्षेप व आत्मस्वरूपाचे आवरण सत्कर्माने, उपासनेने व ज्ञानाने दूर करता येतात. पण हे ज्ञान मिळविण्यासाठी माणसाने आपले मन आत वळवले पाहिजे, म्हणजेच 'मनाने मनाला कोंडले' पाहिजे. ज्याप्रमाणे हरणाची शिकार करण्याची कला (खूण) फक्त जाणत्या पारध्यालाच ठाऊक असते, त्याचप्रमाणे मनाला अंतर्मुख करून विठ्ठलाशी एकरूप होण्याची कला फक्त खऱ्या विष्णुदासालाच साधता येते.
देहाचा पसारा म्हणजे बुजगावणं:
माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या शरीराचे (देहाचे) आणि विषय-वासनांचे चोचले पुरवतो, तो देह तरी कुठे अमर आहे? शेतात उभे केलेले 'बुजगावणे' पाहून चोराला वाटते की तिथे कोणीतरी राखणदार उभा आहे आणि तो पिकाचे रक्षण करतोय (हा केवळ भ्रम असतो); तसेच माणसाला या नश्वर देहाबद्दल आणि संसाररूपी पसाऱ्याबद्दल खोटा भ्रम होतो.
"तैसा जन्मोनि मृत्यूवरी ।
विषयीं त्रासिता बहुतीं परी
संत ज्ञानेश्वर महाराज
हे संत विचार समजल्यावर देहासंबंधीचा पसारा खरा की खोटा हे लक्षात येते.
तुका करी जागा ।
नको वासपूं वाउगा ।
आहेसि तूं अंगा ।
अंगीं डोळे उघडी ॥
तुकोबाराय जीवाला साद घालून जागे करतात— हे माणसा, आता तरी जागा हो! बाहेर उगाच 'वाउगा' (व्यर्थ) इकडेतिकडे फिरत राहू नकोस. तुझा हा देहच देवाचे मंदिर आहे आणि देव तुझ्याच 'अंगात' (हृदयात) विसावला आहे. फक्त डोळे उघडून आत पाहायला शिक. जेव्हा
समाजाने तुकोबारायांचा छळ केला, तेव्हा त्यांनी लोकांशी वाद घातला नाही. ते भामनाथ किंवा भंडारा डोंगराच्या एकांतात निघून गेले त्यांनी बाह्य जगाकडे दुर्लक्ष केले आणि अंतर्मनात विठ्ठलाचा शोध घेतला. जेव्हा त्यांनी स्वतःच्या डोळे उघडले, तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंग दिसू लागला.
भामनाथ डोंगरावर तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष परमेश्वराचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी सर्वात प्रथम सर्व लोकांची कर्ज माफी केली, आणि त्याक्षणी तुकोबाराय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज झाले.
देव फक्त मंदिरात, तीर्थक्षेत्रीच नसून तेथील प्रत्येक जिवा,जीवात, माणसा माणसात , निसर्गात आहे. स्वतःच्या शुद्ध अंतःकरणात शोधल्या नंतर मनातील वाईट विचार, राग द्वेष नष्ट होतात व अंतःकरण शुद्ध होते व वासना कुंठित होऊन मन हेच 'वैकुंठ' बनते.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदभेदभ्रम अमंगळ ॥
!!रामकृष्ण हरी!!
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू
।।श्री तुकोबाराय चैतन्य।।
तुकोबाराय जीवाला साद घालून जागे करतात— हे माणसा, आता तरी जागा हो! बाहेर उगाच 'वाउगा' (व्यर्थ) इकडेतिकडे फिरत राहू नकोस. तुझा हा देहच देवाचे मंदिर आहे