सांगवी : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सांगवी येथील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची एकदिवसीय शैक्षणिक क्षेत्रभेट शुक्रवारी(ता. १६) चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील वैज्ञानिक संकल्पना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, विविध वैज्ञानिक प्रकल्प आणि उपकरणांच्या साहाय्याने समजाव्यात, तसेच विज्ञानातील तत्त्वांचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सायन्स पार्कमधील तारांगणाला भेट देऊन अवकाश संशोधनावरील चित्रफीत पाहिली. त्यातून अवकाश, ग्रह आणि विविध भौगोलिक संकल्पनांची माहिती घेतली. तसेच थ्रीडी चष्म्यांच्या साहाय्याने त्रिमितीय चित्रफितींचा अनुभव घेत जागतिक तापमानवाढ आणि पृथ्वीच्या वाढत्या तापमानासारख्या विषयांची माहिती जाणून घेतली.
सायन्स पार्कचे प्रमुख सुनील पोटे यांनी विद्यार्थ्यांना नायट्रोजन वायूचे दैनंदिन जीवनातील उपयोग आणि त्यासंबंधीची विविध प्रात्यक्षिके दाखवून वैज्ञानिक माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सायन्स पार्कमधील विविध वैज्ञानिक प्रकल्पांची स्वतः हाताळणी करून विज्ञानाची तत्त्वे समजून घेतली. परिसरातील वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित खेळण्यांचा आणि उपकरणांचा अनुभव घेत विद्यार्थ्यांनी विज्ञानासोबत मनोरंजनाचाही आनंद लुटला.
या शैक्षणिक सहलीस विद्यालयाचे प्राचार्य अजिनाथ ओगले, कार्यालयीन प्रमुख राहुल यादव उपस्थित होते. विद्यार्थ्यांसमवेत अध्यापिका भारती भागवत, उज्वला काशीद, सौ. गायकवाड , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रिया बोरकर, मनीषा जाधव आणि वनिता गायकवाड यांनी सहभाग घेतला.
या सहलीचे नियोजन विद्यालयातील विज्ञान विभागप्रमुख संजय मेमाणे यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग, प्रात्यक्षिके आणि वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून विज्ञानाची ओळख करून देणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि विज्ञानाविषयीची आवड वाढविणे, या दृष्टीने ही क्षेत्रभेट उपयुक्त ठरली.
बाबुरावजी घोलप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायन्स पार्कच्या भेटीतून घेतले विज्ञानाचे धडे
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि विज्ञानाविषयीची आवड वाढविणे यासाठी भेटीचे आयोजन केले होते