जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 01 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

जगातील सर्व दुःखाचे मूळ हे 'आशेत' म्हणजेच अपेक्षेत आणि विषयवासनेत आहे. महाराजांनी या सर्व आशांचा त्याग केला आहे.

आम्ही तरी आस ।
झालों टाकोनि उदास ॥१॥
आतां कोण भय धरी ।
पुढें मरणाचें हरी ॥ध्रु॥.
भलते ठायीं पडों ।
देह तुरंगीं हा चढो ॥२॥
तुमचें तुम्हांपाशीं ।
आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥
गेले मानामान ।
सुखदुःखाचें खंडन ॥४॥
तुका म्हणे चित्तीं ।
नाहीं वागवीत खंती ॥५॥
______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
______________________
या अभंगात श्री तुकाराम महाराजांनी पारमार्थिक मार्गावरील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे वर्णन केले आहे, तो टप्पा म्हणजे 'पूर्ण वैराग्य' आणि 'देहबुद्धीचा त्याग'.
जेव्हा एखादा साधक भगवद्भक्तीत पूर्णपणे बुडून जातो, तेव्हा त्याची अवस्था कशी होते, याचे सुंदर वर्णन "आम्ही तरी आस । झालों टाकोनि उदास ॥" या अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज करतात.
जगातील सर्व दुःखाचे मूळ हे 'आशेत' म्हणजेच अपेक्षेत आणि विषयवासनेत आहे. महाराजांनी या सर्व आशांचा त्याग केला आहे.
'उदास' होणे म्हणजे संसाराचा राग करणे नव्हे, तर संसारातील नश्वर गोष्टींबद्दल तटस्थ (उदासीन) होणे.
जेव्हा सर्व वासना गळून पडतात, तेव्हाच खऱ्या परमार्थाची सुरुवात होते.
वासनाक्षय आणि उदासिनता:
मृत्यूचे भय नाहीसे होणे:
ज्या माणसाला संसाराची, संपत्तीची किंवा नात्यांची आस असते, त्यालाच मरणाची सर्वात जास्त भीती वाटते. पण तुकोबाराय निर्भयपणे सांगतात, "आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥".
आम्ही तर आमचे सर्वस्व त्या हरीच्या चरणी अर्पण केले आहे. जो मृत्यूचाही नियंता आहे, तो हरी जेव्हा पाठीशी असतो, तेव्हा मरणाची भीती कशी उरणार?
देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणों नये धनंजया, जियापरी"
भक्त हा मृत्यूलाही जन्म एक उत्सव मानतो.
"भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥"
सर्वसामान्य माणूस आयुष्यभर देहाचे लाड पुरवण्यात व्यस्त असतो. परंतु, तुकोबाराय म्हणतात की आमचा हा देह 'तुरंगी' म्हणजे वैभवाच्या घोड्यावर, हत्तीवर बसून मिरवला काय किंवा तो 'भलते ठायी' म्हणजे अगदी धुळीत, स्मशानात पडला काय; आम्हाला त्याचे काहीच सुख-दुःख नाही. देह ही केवळ एक तात्पुरती वस्त्रे आहेत, आत्मा अमर आहे ही जाणीव त्यांना झाली आहे.
द्वंद्वांच्या पलीकडील अवस्था:
"तुमचें तुम्हांपाशीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥" आणि "गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥"
यातुन संतांची समत्व बुद्धी दिसून येते. संसारातील लोकांचे नियम, त्यांच्या व्यावहारिक अपेक्षा त्यांच्यापाशीच राहू द्यात, आम्ही आता आमच्या मूळ स्वरूपात (सहज स्थितीत) स्थिर झालो आहोत. जिथे देहभावच उरला नाही, तिथे कुणी 'मान' दिला काय किंवा 'अपमान' केला काय, काय फरक पडतो? सुख आणि दुःख ही मनाची द्वंद्वे आहेत,
चित्ताची प्रसन्नता
"तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥"
प्रपंचाची किंवा भविष्याची कोणतीही काळजी, दुःख किंवा खंत आता माझ्या चित्तात (मनात) शिल्लक राहिलेली नाही. कारण चित्त आता संपूर्णपणे विठ्ठलमय झाले आहे.
अभंगाचे निष्कर्ष:
जोपर्यंत आपण 'मी आणि माझे' या पाशात अडकलो आहोत, तोपर्यंत भय आणि दुःख कायम राहील. पण ज्या दिवशी आपण भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून आशा - अपेक्षांचा त्याग करू, त्या दिवशी आपल्यालाही हीच परम शांती आणि निर्भयता प्राप्त होईल.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान,
श्री क्षेत्र देहू.