जाहिरातीसाठी संपर्क करा
11 September 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 08 September 2026

आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक कामालाच भक्तीचे आणि अध्यात्माचे रूप देणारे संत सेना महाराज सन्मेष पांडे

संत ज्ञानेश्र्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत.

देहू: संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील ज्ञानदेव-नामदेव कालखंडातील एक अत्यंत थोर आणि श्रेष्ठ संत-कवी आहेत. त्यांनी आपल्या प्रत्यक्ष व्यावहारिक कामालाच भक्तीचे आणि अध्यात्माचे रूप दिले.यांच्या जन्मस्थळाबाबत अभ्यासकांमध्ये दोन प्रमुख मतप्रवाह आहेत. काही अभ्यासकांच्या मते त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील बांधवगड (रेवा संस्थान) येथे १३ व्या किंवा १४ व्या शतकात झाला (वडिलांचे नाव देविदास आणि आईचे नाव प्रेमकुंवरबाई). तर काही संशोधक त्यांच्या अस्सल मराठी भाषेवरून त्यांचा मूळ संबंध महाराष्ट्राशी जोडतात.
महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. ते स्वामी रामानंद यांचे शिष्य मानले जातात. आणि संत नामदेवांचे समकालीन म्हणून वारकरी संप्रदायात त्यांना मानाचे स्थान आहे.
घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान होता. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले असायचे. एक आख्यायिका आहे की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले.
सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.

आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
सकल संत गाथेत' संत सेना महाराजांचे सुमारे १२५ ते १३३ अभंग उपलब्ध आहेत.
श्री गुरू ग्रंथ साहिबमध्ये स्थान: संत नामदेवांप्रमाणेच संत सेना महाराजांच्या भक्तीरचनेला शीख धर्माच्या पवित्र 'श्री गुरू ग्रंथ साहिब' मध्येही समाविष्ट केले गेले आहे, जे त्यांच्या व्यापक लोकप्रियतेची आणि प्रभावाची साक्ष देते.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. संत ज्ञानेश्र्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत.
संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात, हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले.
संत सेनामहाराज हे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उतर भारतामध्ये गेले होते. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी. संत नामदेवांप्रमाणेच संत सेना यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांमध्ये साहित्य लिहिले आहे.
जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती. त्यांच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनर्वैभव प्राप्त झाले. राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप ङोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले.
'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते. विनम्र अभिवादन.
लेखक: सन्मेष संजय पांडे
संत तुकाराम महाराज संस्थान, देहू
नगाऱ्याचे मानकरी. श्री क्षेत्र देहू.