देहू: आषाढी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालत असतात. या प्रवासात दुर्दैवाने एखाद्या वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारख्या अनपेक्षित कारणामुळे निधन झाले, तर त्या वारकऱ्याच्या कुटुंबाला श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने एक लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येईल, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे यांनी दिली.
ही मदत दुःखाची भरपाई नाही, तर संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून आणि वारकरी कुटुंबाप्रती असलेल्या आपुलकीतून उचललेले एक छोटेसे पाऊल आहे. सर्व वारकरी बंधू-भगिनींना आमचे नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पुरेसे पाणी प्या, वेळेवर अन्न घ्या, थकवा जाणवल्यास विश्रांती घ्या आणि कोणतीही आरोग्यविषयक अडचण जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय पथकाशी संपर्क साधा.वारी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण स्वतः सुरक्षित राहू आणि आपल्या शेजारी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचीही काळजी घेऊ.
“एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ.” या संतवचनाप्रमाणे सेवाभाव जपत आपण ही वारी अधिक सुरक्षित आणि मंगलमय करूया. आर्थिक मदतीसाठी संस्थानने निश्चित केलेले नियम व अटी लागू राहतील, असे श्री.मोरे यांनी सांगितले.
देहू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत
आषाढी वारीत पालखीमार्गावर अपघात अथवा वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे.