जाहिरातीसाठी संपर्क करा
28 July 2026
← मुख्यपृष्ठ
क्रीडा ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 22 July 2026

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत अथोकपाम सिंगे प्रथम

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे.

बारामती: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री, ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमीत्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीया नवी दिल्ली आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे वुधवारी(ता.22)आयोजन करण्यात आले होते. पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे विजेता ठरला.तर राष्ट्रीय घाटाचा राजा किताब कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत याने पटकाविला. बारामतील गदिमा सभागृहात पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या स्पर्धेसाठी देशभरातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४२५ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले.
अण्णा बनसोडे म्हणाले अजित पवार हे शेतकरी कष्टकरी फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारे नेतृत्व होते. दादा शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी सतत झटत राहिले. त्यांच्या अडीअडचणीत रात्री अपरात्री उभे राहून अश्रू पुसायचे. जाती पातीचा कधीच विचार न करता वंचितांच्या मदतीने धावून जायचे. दादांनी केलेला विकास पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिले की कळतो. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मोठी संधी दिली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी प्रास्ताविकात सांगितले , ही सायकल स्पर्धा अजित पवार यांच्या प्रेरणेने सुरू झाली आहे. स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या देशभरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४२५ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी सायकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी सांभाळल्या. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. ही स्पर्धा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरत आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे(कंसात कि.मी. व वेळ):
घाटाचा राजा(दिवे घाट) - राष्ट्रीय स्पर्धा- कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत (८. मी. ३२ सेकंद )
घाटाचा राजा (दिवे घाट) - राज्य स्पर्धा - महाराष्ट्राचा निहाल नदाफ ( ८ मी. ४०सेकंद )
१) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय स्तर (१२२ कि.मी.), प्रथम क्रमांक - मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे (२.२९.००), द्वितीय क्रमांक - तामिळनाडूचा जोएल सुंदराम (२.२९.३७), तृतीय क्रमांक - गुजरातचा ध्रुव दिया (२.३०.३०) याने पटकावला.
२) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर - (१२२ कि.मी.)
प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा अमन तांबोळी (२.३७.३३), द्वितीय क्रमांक -महाराष्ट्राचा हनुमान चोपडे (२.३८.२७), तृतीय क्रमांक - महाराष्ट्राचा रेहान शेख (२.३९.४८) याने पटकावला.
३) सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.)
प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा ओंकार खेडकर (२.४१.०९), द्वितीय क्रमांक - महाराष्ट्राचा स्वराज कराळे (२.४१.१२), तृतीय क्रमांक -महाराष्ट्राचा वेदांत टिळेकर (२.४१.१५) याने मिळवला.
४) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर (१५ कि.मी.)
प्रथम क्रमांक - कर्नाटकच्या गंगा दांडीन ( २२. ११. ०८२ मिनिटात), द्वितीय क्रमांक- महाराष्ट्राच्या योगेश्वरी कदम(२२.१२.८१५ मिनिटात ), तृतीय क्रमांक -महाराष्ट्राच्या राजनंदिनी सोमवंशी (२२.१२.९२० मिनिटात) यांनी पटकावला.
सासवड - बारामती सायक्लोथॉन (८५ कि. मी.)
प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा अनुप पवार (२.१५.५४), द्वितीय क्रमांक- महाराष्ट्राचा अक्रम देवकाते (२.१६.०४), तृतीय क्रमांक - महाराष्ट्राचा खदुस शेख (२.१८.२७)याने पटकावला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हाळसाकांत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे सादरीकरण केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्षा श्वेता नाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जगताप, माळेगाव सह. साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन संगीता कोकरे, मालेगाव नगर पंचायत नगराध्यक्ष सुयोग सातपुते, राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष बारामती अध्यक्ष संदीप बांदल, बारामती शहर अध्यक्ष  ॲड. किरण इंगळे, प्रवीण पाटील, प्राचार्य देविदास वायदंडे, जेष्ठ नेते विश्वास देवकाते, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, आजीव सदस्य अशोक खळदकर, विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य भरत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए. एम जाधव तसेच सायकल असोसिएशनचे सचिव संजय साठे , दिपाली पाटील, श्रीनाथ थोरात, सुदाम रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेस विद्या प्रतिष्ठान बारामती व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड व प्रा. संध्याराणी आटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.