जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 05 October 2026

श्री जैन विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा; गुरुवर्य घनश्याम कांबळे यांचा गौरव

जीवनात कितीही यश मिळाले तरी आई-वडील आणि शिक्षकांना कधीही विसरू नका

चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री जैन विद्यालय, चिंचवड येथे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे माजी प्राचार्य घनश्याम कांबळे यांना मानपत्र प्रदान करून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सचिन पटवर्धन उपस्थित होते.
गुरुवर्य घनश्याम कांबळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सत्काराला उत्तर देताना घनश्याम कांबळे म्हणाले, “मुलं कितीही मोठी झाली, तरी शिक्षकांना ती नेहमी आपली मुलंच वाटतात. आजचा हा माजी विद्यार्थी मेळावा आमच्या जीवनातील सुवर्ण दिवस आहे.” तसेच जीवनात कितीही यश मिळाले तरी आई-वडील आणि शिक्षकांना कधीही विसरू नका, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. “आई-वडिलांपेक्षा जगात मोठे कोणी नाही,” असेही त्यांनी सांगितले.
या मेळाव्यामुळे अनेक वर्षांनंतर माजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने कार्यक्रमाला भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंदांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.