देहू : देहू-देहूरोड परिसरात मंगळवारी (ता. २०) विजयादशमी अर्थात दसरा सण विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा सीमोल्लंघन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यासाठी आकर्षक फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. टाळकरी, चौघडा, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. देऊळवाडा ते विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरापर्यंतच्या मार्गावर भाविकांनी फुलांची उधळण केली होती. तसेच ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
या वेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, माजी विश्वस्त माणिक महाराज मोरे, कीर्तनकार पुंडलिक महाराज मोरे, सुनील महाराज मोरे आदी उपस्थित होते.
विजयादशमीनिमित्त संस्थानच्या वतीने भाविकांना आपट्याची पाने वाटण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी दसऱ्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात
देहू-देहूरोड परिसरात दसरा सण उत्साहात साजरा