जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
आरोग्य ताज्या बातम्या एम.डी.पी. 24 October 2026

मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न

पुणे जिल्ह्यात ११८ सत्रांतून ११ हजार ६३० विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यजागृती; ११ हजार ९७ विद्यार्थ्यांची आरोग्यविषयक शपथ

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद : जागर आरोग्याचा’ हा उपक्रम पुणे जिल्ह्यात १३ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ११८ आरोग्यजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ११ हजार ६३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, तर ११ हजार ९७ विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शपथ घेतली.
राज्य मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यभर राबविण्यात आला. वैद्यकीय व आरोग्यविषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जाणीवजागृती करण्यावर या अभियानात भर देण्यात आला.
जिल्ह्यात ११८ आरोग्यजागृती सत्रांचे आयोजन:
पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (MUHS) संलग्न महाविद्यालयांच्या माध्यमातून ८१, आयुष महाविद्यालयांच्या माध्यमातून ३३, तर इतर संस्थांच्या माध्यमातून चार सत्रे आयोजित करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविण्याबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, अशी माहिती डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाने जिल्ह्यात सर्वाधिक ११ सत्रांचे आयोजन केले. या सत्रांमध्ये ६९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, सहभागी झालेल्या सर्व ६९३ विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक शपथ घेतली. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आरोग्यजागृतीचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यात महाविद्यालयाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, व्यसनमुक्त जीवनशैली, आत्महत्या प्रतिबंध, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक व भावनिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडविण्याचा संकल्प:
मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यजागृती निर्माण करून व्यसनमुक्त, निरोगी आणि आत्मविश्वासपूर्ण पिढी घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तरुणाईच्या आरोग्यातूनच महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडेल. या जनजागृती अभियानात योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!”