देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ७३
नव्हे आराणूक संवसारा हातीं ।
सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥१॥
देवधर्म सांदीं पडिले सकळ ।
विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु.॥
रात्रिदिवस न पुरे कुटुंबी समाधान ।
दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥३॥
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी ।
थोर होते चुकी नारायणीं ॥४॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
_______________________
जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज या अभंगात केवळ प्रपंचात आणि पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसाची दयनीय स्थिती मांडत आहेत. मनुष्य जन्माचा मुख्य हेतू भगवत प्राप्ती आणि आत्मानंद मिळवणे हा आहे.
परंतु, अज्ञानी जीव संसाराच्या चिंतेत आणि पैशांच्या हव्यासात इतका बुडून जातो की, तो स्वतःच्याच हाताने स्वतःच्या अमूल्य जीवनाचा घात कसा करतो, याचे ज्वलंत आणि वास्तववादी चित्र महाराजांनी येथे उभे केले आहे.
नव्हे आराणूक संवसारा हातीं ।
सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥
केवळ संसार करणाऱ्या प्रापंचिक माणसाला या संसाराच्या रहाटगाडग्यातून कधीही 'आराणूक' (सवड किंवा क्षणभराची विश्रांती) लाभत नाही.
रात्रिदिवस न पुरे कुटुंबी समाधान ।
दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥
त्याच्या चित्तात (मनात) चोवीस तास 'हाचि धंदा' म्हणजे पैसा कसा मिळवायचा, व्यापार कसा वाढवायचा, याच चिंता धुमाकूळ घालत असतात. या अविरत धावपळीमुळे त्याचे 'देवधर्म' सर्व सांदीत (कोपऱ्यात) पडतात. म्हणजेच त्याला देवाचे नाव घेण्याची किंवा धर्माचे आचरण करण्याची आठवणही राहत नाही; कारण त्याच्या अंतःकरणात केवळ भौतिक सुखांच्या (विषयीं) विचारांचा 'गोंधळ' गाजत असतो.
माणूस आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी रात्रंदिवस रक्ताचे पाणी करतो, कष्ट उपसतो. परंतु, संसाराची वासना आणि अपेक्षा अशी आहे की, रात्रंदिवस राबूनही कुटुंबाचे 'समाधान' कधीच पूर्ण होत नाही; त्यांची मागणी नित्य नवीन असते. या न संपणाऱ्या मागण्या पूर्ण करता करता माणसाचे अख्खे आयुष्य संपून जाते, त्यामुळे त्याला ईश्वराचे 'दर्शन' (भक्तीची ओढ) मिळणे अत्यंत 'दुर्लभ' म्हणजेच अशक्य होऊन बसते.
ज्याप्रमाणे तेल काढणाऱ्या घाण्याला जुंपलेला बैल दिवसभर मैलोन्मैल चालत असतो, खूप कष्ट करतो. परंतु, त्याचे डोळे बांधलेले असल्यामुळे दिवसभराच्या कष्टांनंतरही तो त्याच जागेवर उभा असतो, तो कुठेही पुढे जात नाही.
प्रपंचात विवेकाशिवाय दिवसरात्र राबणाऱ्या माणसाचे आयुष्यही या घाण्याच्या बैलासारखेच होते; तो खूप कष्ट करतो पण आत्मिक सुखाच्या बाबतीत एकाच जागी अडकून पडतो.
आपण या जगात केवळ संसाराचे गुलाम होण्यासाठी आलेलो नाही, तर विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी आलो आहोत .
तुका म्हणे आत्महत्या रे घातकी ।
थोर होते चुकी नारायणीं ॥
तुकाराम महाराज म्हणतात की, ज्या माणसाला देवाने एवढा सुंदर मनुष्यदेह दिला, पण ज्याने नामस्मरण न करता केवळ संसारात आयुष्य वाया घालवले, तो दुसरा कोणी नसून स्वतःचाच घात करणारा 'आत्महत्यारा' आहे! यापेक्षा मोठी 'घातकी' गोष्ट कोणती असू शकते? त्या 'नारायणाचा' विसर पडणे ही माणसाच्या जन्मातील सर्वात 'थोर चुकी' (मोठी चूक) आहे, ज्याचे प्रायश्चित्त ८४ लक्ष योनींच्या फेऱ्यात अडकून भोगावे लागते.
श्री संत तुकाराम महाराज आपल्याला संसाराचा त्याग करायला सांगत नाही, तर संसारात राहूनही देवाला विसरू नका, हा मोलाचा संदेश देतात.
प्रपंचाची कर्तव्ये पार पाडत असताना चित्त विठ्ठलाच्या चरणी ठेवणे आवश्यक आहे. जर आपण कष्टांच्या गर्दीत देवाला कोपऱ्यात टाकले, तर आपण स्वतःच स्वतःच्या अध्यात्मिक प्रगतीची हत्या करत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे.
।। रामकृष्णहरी ।
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान ,
श्रीक्षेत्र देहू .
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
प्रपंचाची कर्तव्ये पार पाडत असताना चित्त विठ्ठलाच्या चरणी ठेवणे आवश्यक आहे. जर आपण कष्टांच्या गर्दीत देवाला कोपऱ्यात टाकले, तर आपण स्वतःच स्वतःच्या अध्यात्मिक प्रगतीची हत्या करत आहोत.