जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 16 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

मोत्याची चमक आणि त्याचे तेज (पाणी) अत्यंत निर्मळ असते. पण ती चमक जिभेने चाखण्याचा प्रयत्न करू नये किंवा ती चाखण्यासाठी मोती फोडू नये.

देहू संतवाणी,
अभंग क्रमांक: ६४
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल ।
खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद ।
यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम ।
तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य।।
_______________________
या अभंगात जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज मानवी मनाच्या एका सहज प्रवृत्तीवर बोट ठेवतात. माणसाला कोणतीही सुंदर किंवा आवडती गोष्ट दिसली, की ती संपूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यावी, तिचा आस्वाद घ्यावा किंवा ती ओरबाडून घ्यावी, अशी तीव्र इच्छा होते. परंतु, परमार्थात आणि व्यवहारातही काही गोष्टींची मर्यादा पाळणे किती गरजेचे आहे, हे सांगताना तुकाराम महाराज अनेक सुंदर दृष्टांत देतात,आणि शेवटी, निष्काम कर्म आणि निस्सीम भक्तीचे 'वर्म' (रहस्य) ते या अभंगातून उलगडून दाखवतात.
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल ।
खाऊं नये मूल आवडतें ॥
एखाद्या फुलाचा सुगंध (परिमळ) अत्यंत मधुर आहे म्हणून ते फूल हाताने चोळू नये किंवा त्याचा चेंदा मेंदा करू नये. तसे केल्यास फुलाचे सौंदर्य आणि सुगंध दोन्ही नष्ट होते. तसेच, आपले स्वतःचे लहान मूल आपल्याला खूप आवडते, त्याच्यावर आपले अथांग प्रेम असते; पण म्हणून प्रेमाच्या भरात कोणी आपल्या मुलाला खाऊन टाकत नाही.
प्रेम किंवा आवड असणे यात गैर नाही, पण तिथे आदर आणि मर्यादा असायला हवी. अति उपभोग किंवा अति आसक्ती ही वस्तूच्या आणि नात्याच्या विनाशास कारणीभूत ठरते. वस्तूचा आस्वाद घ्यावा, पण ती नष्ट करू नये.
सौंदर्याचे मर्म आणि कुतूहलाचा अतिरेक:
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद ।
यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
मोत्याची चमक आणि त्याचे तेज (पाणी) अत्यंत निर्मळ असते. पण ती चमक जिभेने चाखण्याचा प्रयत्न करू नये किंवा ती चाखण्यासाठी मोती फोडू नये. तसेच, एखादे वाद्य (यंत्र) अतिशय मधुर आणि सुरेल नाद (संगीत) निर्माण करते. पण हा नाद येतो कुठून, हे पाहण्याच्या कुतूहलापोटी ते वाद्यच फोडून (भेदुनि) टाकू नये. जर वाद्यच फोडले तर संगीत कायमचे बंद होईल.
सृष्टीतील काही गोष्टी केवळ लांबून अनुभवण्याच्या, डोळ्यांनी पाहण्याच्या किंवा कानांनी ऐकण्याच्या असतात. त्यांचा अतिरेकी शोध किंवा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यातील मूळ सौंदर्य आणि आनंद नाहीसा होतो. म्हणूनच, सौंदर्याचा आणि कलेचा आदर दूर राहूनच करावा.
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम ।
तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥
निष्काम कर्म आणि भक्तीचे वर्म सांगताना वरील सर्व दृष्टांत देऊन तुकोबाराय मूळ सिद्धांताकडे येतात.
ते म्हणतात की, आपण जी कर्मे करतो, त्या कर्मातून फळ मिळणार हे निश्चित असले, तरी कर्माचे फळ मिळवण्याच्या इच्छेने (कामनेने) कोणतेही कर्म करू नये. म्हणजेच, भगवद्गीतेतील 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,
हाच विचार तुकाराम महाराज येथे मांडताना म्हणतात की, फळाची अपेक्षा न ठेवता, ईश्वराच्या चरणी समर्पित होऊन कर्म करणे, हेच माणसाला बंधनातून मुक्त करू शकते. निष्काम सेवा हीच खरी भक्ती आहे.
!!रामकृष्णहरी!
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू .