जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 11 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

देहू :
जया नाहीं नेम एकादशीव्रत ।
जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे ।
रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन ।
नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥
जये कुळीं नाहीं एकही वैष्णव ।
त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड ।
प्रत्यक्ष तें कुंड चर्मकांचें ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय ।
कीर्तना नवजाय हरीचिया ॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
______________________
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगात वारकरी संप्रदायातील आचारधर्माचे अंतिम महत्त्व सांगत आहेत. भक्ती ही केवळ मनात असून चालत नाही, तर ती आचरणात आणि जीवनशैलीत दिसली पाहिजे. ज्या घरात विठ्ठलाचे नाम नाही, एकादशीचा नेम नाही आणि तुळशीचे वृंदावन नाही, ते घर आणि तो देह जिवंत असूनही कसे मृतप्राय आहेत, यावर महाराजांनी अत्यंत कडक शब्दांत प्रहार केला आहे.
एकादशीचा नेम आणि काळाचा भय:
जया नाहीं नेम एकादशीव्रत ।
जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे ।
रागें दात खाय कराकरा ॥
अभंगाच्या सुरुवातीलाच संत तुकाराम महाराज म्हणतात की, ज्याच्या आयुष्यात एकादशीच्या पवित्र व्रताचा कोणताही नेम किंवा नियम नाही, त्याला या जगात जिवंत समजू नका, तो सर्व लोकांमध्ये एक 'जिवंत प्रेत' (प्रेत सर्व लोकीं) आहे. अशा भगवद्द्वेषी माणसाच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण 'काळ' (मृत्यू/यमदूत) नित्य मोजत असतो आणि त्याच्या पापांकडे पाहून रागाने 'कराकरा दात खात' योग्य वेळेची वाट पाहत असतो.
घरात आणि कुळात भक्तीचा अभाव:
जये कुळीं नाहीं एकही वैष्णव ।
त्याचा बुडे भवनदीतापा ॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड ।
ज्या घराच्या दारात अंगणात पवित्र तुळशीचे वृंदावन नाही, ते घर नसून साक्षात 'स्मशान' आहे. तुळस ही पवित्रतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे, ती नसेल तिथे भूत-पिशाच्च राहतात. ज्या कुळामध्ये (घराण्यात) एकही विठ्ठलभक्त म्हणजेच 'वैष्णव' जन्माला आला नाही, ते संपूर्ण कुळ संसाराच्या (भवनदीच्या) आधिव्याधी आणि त्रिविध तापात बुडून नष्ट होते.
अपवित्र मुख आणि कोरडा देह:
प्रत्यक्ष तें कुंड चर्मकांचें ॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय ।
कीर्तना नवजाय हरीचिया ॥
ज्या तोंडाने कधी विठ्ठलाचे नाम घेतले नाही, ते तोंड म्हणजे केवळ चामड्याचे पाकीट किंवा चर्मकाराचे कातडे कमवायचे दुर्गंधीयुक्त 'कुंड' आहे, असे समजावे. शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की, ज्या पायांनी माणूस कधी हरीकीर्तनाला जात नाही आणि ज्या हातांनी कधी टाळी वाजवून देवाची सेवा करत नाही, ते हात-पाय नसून वाळलेले 'काष्ठ' (लाकूड) आहेत. भक्तीशिवाय देहाचे अवयवही निरुपयोगी ठरतात.
ज्याप्रमाणे एखादी विहीर दिसायला खूप मोठी आणि सुंदर असते, पण जर तिच्यात पाण्याचा एकही थेंब (निसर्गदत्त गोडवा) नसेल, तर ती विहीर निरुपयोगी ठरते; माणसे तिच्याकडे फिरकतही नाहीत. अगदी त्याचप्रमाणे, माणसाकडे कितीही संपत्ती किंवा सुंदर शरीर असले, पण जर मनात भक्तीचा आणि विठ्ठलनामाचा गोडवा नसेल, तर त्याचे जीवन त्या कोरड्या विहिरीसारखे निरुपयोगी आणि स्मशानासारखे भयानक ठरते.
"तुका म्हणे ज्याचे मुखी नाही नाम । त्याचे तोंड चर्म कुंडा सम ॥"
भगवंताचे नाम नसलेले मुख हे नेहमी अपवित्रच असते
"एकादशी व्रत जे करिती सप्रेम । तयांचे चरणी माझा दंडवत प्रणाम ॥"
वारकरी संप्रदायात एकादशी व्रताला संतांनी मानले आहे, कारण हे व्रत मनाची आणि शरीराची शुद्धी करते.
आळस सोडून भक्ती मार्गावर चालण्याची शक्ति देते. दारात तुळस असणे, मुखात विठ्ठलाचे नाव असणे, एकादशीचा नियम पाळणे आणि संतांच्या कीर्तनात सहभागी होणे, या साध्या गोष्टींमुळेच आपले घर 'स्मशान' न राहता 'वैकुंठ' बनते.
।। रामकृष्णहरी ।।
क्रमशः
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान,
श्रीक्षेत्र देहू.