जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
संस्कृती ताज्या बातम्या एम.डी.पी. 20 October 2026

।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।

व्यावहारिक जगातील धन-दौलत आज आहे तर उद्या नाही, पण भक्तीचे धन हे 'सरतीं पुरतीं' म्हणजे कधीही न संपणारे

देहू संतवाणी
अभंग क्रमांक: ६८
पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥१॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥
तींच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥३॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥४॥
_______________________
।। श्री तुकोबाराय चैतन्य ।।
_______________________
चित्ताची शुद्धता हेच सर्वात मोठे सोंवळे आहे आणि तिथेच देव निवास करतो.
पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥
ज्यांचा आवडता देव ।अखंडित प्रेमभाव ॥
या पृथ्वीवर खऱ्या अर्थाने पवित्र आणि सोंवळी तीच माणसे आहेत, ज्यांच्या अंतःकरणात केवळ आणि केवळ 'पांडुरंग' हाच एक आवडता देव आहे. ज्यांचे चित्त चंचल नाही आणि ज्यांच्या मनात भगवंताविषयी 'अखंडित प्रेमभाव' (कधीही न तुटणारे प्रेम) दाटलेला आहे, तेच खरे सोंवळे आहेत. केवळ बाह्य अंग धुण्याने किंवा सोवळे नेसल्याने माणूस पवित्र होत नाही, तर अंतःकरणात हरीचे प्रेम असेल तरच तो पावन होतो.
संत नामदेव महाराज लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना विठ्ठलाला नैवेद्य दाखवायला सांगितले. नामदेवांना बाह्य पूजाविधी किंवा कर्मकांडाचे 'सोंवळे-ओवळे' माहीत नव्हते. पण त्यांच्या मनात 'अखंडित प्रेमभाव' होता. त्यांनी देवाला हट्ट धरून जेवायला लावले आणि साक्षात विठ्ठलाला प्रकट होऊन तो नैवेद्य खावा लागला. देवाला बाह्य नियम नकोत, तर अंतरीचे पवित्र प्रेम हवे असते, हेच यावरून सिद्ध होते.
तींच भाग्यवंतें ।
सरतीं पुरतीं धनवित्तें ॥
ज्यांच्याकडे विठ्ठल नामाचे धन आहे, तीच माणसे या जगात खरोखर 'भाग्यवंत' (नशीबवान)आहेत.
व्यावहारिक जगातील धन-दौलत आज आहे तर उद्या नाही, पण भक्तीचे धन हे 'सरतीं पुरतीं' म्हणजे कधीही न संपणारे आणि सर्व गरजा पूर्ण करणारे असते. ही भक्तमंडळी मनाने अत्यंत श्रीमंत आणि बुद्धीने तल्लख असतात, कारण त्यांच्या बुद्धीचा दाता स्वतः नारायण असतो.
"तुका म्हणे देवा ।
त्यांची केल्या पावे सेवा ॥"
पवित्र आणि अखंड प्रेमभाव असणाऱ्या संतांची व भक्तांची सेवा करणे, म्हणजेच साक्षात परमेश्वराची सेवा करणे होय. जो अशा सज्जनांची मनोभावे सेवा करतो, त्याची सेवा थेट ईश्वरापर्यंत पोहोचते आणि देव त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होतो.
धर्माचे बाह्य अवडंबर आणि कर्मकांड करण्यापेक्षा आपल्या मनात देवाविषयी निस्सीम प्रेम निर्माण करणे महत्त्वाचे आहे. ज्याचे मन शुद्ध आहे आणि वाचेत नाम आहे, तोच या भूमंडळावर सर्वात पवित्र आणि भाग्यवान पुरुष आहे.
।। रामकृष्णहरी ।!
क्रमश:
नितीन महाराज मोरे
माजी अध्यक्ष
श्री संत तुकाराम महाराज संस्थान
श्री क्षेत्र देहू .