जाहिरातीसाठी संपर्क करा
26 October 2026
← मुख्यपृष्ठ
आरोग्य ताज्या बातम्या एम.डी.पी. 11 October 2026

देहूतील कचरा डेपो व्यवस्थापन सुधारा, भाजपची मागणी

सुधारणा न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन, कचरा वाहतूक रोखण्याचा इशारा

देहू : तीर्थक्षेत्र देहू येथील कचरा डेपोत योग्य व्यवस्थापन नाही, कचरा जाळण्याचे प्रकार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे पर्यावरण समस्या निर्माण झालेली आहे . या पार्श्वभूमीवर देहू शहर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. या समस्यांबाबत भाजपच्या वतीने देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, येत्या १० दिवसांत ठोस सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कचरा जाळल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर:
देहू नगरीतील कचरा डेपोवर कचरा जाळला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकारामुळे दुर्गंधीयुक्त धूर आणि प्रदूषणाचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कचरा जाळण्याचे प्रकार तातडीने थांबवून नागरिकांना प्रदूषणापासून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कचरा डेपोच्या सुरक्षेचा अभाव; शेतकऱ्यांचे नुकसान:
देहू नगरपंचायत हद्दीबाहेरील कचराही डेपोत आणून टाकला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. डेपो परिसराला पूर्ण संरक्षण भिंत किंवा कंपाऊंड नसल्याने परिसरातील पाळीव जनावरे कचरा खाण्यासाठी तेथे जातात. दलदलीत जनावरे फसण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
भाजपच्या प्रमुख मागण्या:
कचरा डेपोवरील परिस्थिती सुधारण्यासाठी भाजपने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत.
१. कचरा डेपोवर कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी.
२. देहू नगरपंचायत हद्दीबाहेरील कचऱ्याच्या गाड्यांना डेपोमध्ये प्रवेश देणे तातडीने बंद करावे.
३. डेपो परिसरात २४ तास कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
४. कचरा जाळण्याचे प्रकार त्वरित थांबवून शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करावे.
५. कचरा डेपोला संपूर्ण कंपाऊंड घालून परिसर सुरक्षित करावा.
६. कचरा डेपो मुख्य रस्ता आणि निवासी क्षेत्रापासून एक हजार मीटर अंतरावर हलविण्याबाबत कार्यवाही करावी.
१० दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा:
कचरा डेपोवरील समस्यांसाठी नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. प्रशासनाला सुधारणा करण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत ठोस कार्यवाही न झाल्यास नगरपंचायत कार्यालयासमोर कचरा आणून जाळण्याचे आंदोलन करण्यात येईल, तसेच कचरा डेपोवर कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या करू दिल्या जाणार नाहीत, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
देहूतील नागरिकांचे आरोग्य, परिसरातील पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे नुकसान या प्रश्नांवर नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.