देहू : आदर्श माता वैकुंठवासी जनाबाई रामचंद्र हगवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी( ता.2 ) त्यांचे मुलगा मच्छिंद्र हगवणे व हगवणे परिवारातील सर्व सदस्याच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या संत जिजाबाई कन्या विद्यालय येथील गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सुविधा मिळावी आणि त्यांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळावी, या उदात्त हेतूने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर म्हणाल्या, “समाजामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अनेक व्यक्ती व कुटुंबे समाजोपयोगी कार्य करीत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबातील गरीब विद्यार्थ्याने शिक्षण घेतले पाहिजे, या उदात्त हेतूने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. हाच वसा आणि वारसा मच्छिंद्र हगवणे व त्यांचा परिवार पुढे चालवत आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.”
विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी हगवणे परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, विद्यार्थिनी व हगवणे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
देहू गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना सायकल वाटप
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबातील गरीब विद्यार्थ्याने शिक्षण घेतले पाहिजे, या उदात्त हेतूने रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.