जाहिरातीसाठी संपर्क करा
11 September 2026
← मुख्यपृष्ठ
शिक्षण ताज्या बातम्या वेदांत परंडवाल 11 September 2026

परंदवडी येथील संगिता भोसले यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

संगीता भोसले यांनी कृतीयुक्त अध्यापन तसेच अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत

मावळ : परंदवडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका संगिता किशोर भोसले यांना प्रथम क्रमांकाचा पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार 2026 शिक्षकदिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुण्यातील गणेश कला- क्रीडा मंच येथे झालेल्या सोहळ्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम विभागाच्या सभापती दिपाली हुलावळे, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, मावळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी
शिल्पा रोडगे , मुळशी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संग्राम पाटील व इतर उपस्थित होते.
संगीता भोसले यांनी कृतीयुक्त अध्यापन तसेच अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.विविध स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती,नवोदय,सैनिकी स्कूल परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती व ई-साहित्य निर्मिती केलेली आहे. शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा, निपूणोत्सव स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर संगिता भोसले यांनी नैपुण्य मिळवलेले आहे. स्वनिर्मित शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी विशेष उपक्रम राबवलेले आहेत. विद्यार्थी विकासासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थीप्रिय व तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती असून सातत्याने त्या विद्यार्थी हितासाठी झटत असतात. यापूर्वी त्यांना जिल्हास्तर व तालुका स्तरावर विविध क्षेत्रातील अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.विविध उपक्रमांमधून त्यांनी आपल्या कौशल्याची आणि कार्याची चुणूक दाखवून दिली आहे.विद्यार्थी हितदक्ष, कर्तव्यतत्पर, हरहुन्नरी शिक्षिका म्हणून त्या सर्वश्रुत आहेत.
त्यांना मिळालेल्या या जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका उषा सरकटे,केंद्रप्रमुख सविता क्षीरसागर , शिक्षण विस्तार अधिकारी सुदाम वाळुंज,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य,सरपंच व सदस्य, ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.